BEST झालं! मुंबईची BEST होणार हायटेक, प्रवास होणार अधिक सुकर, कसा तो पाहा

बेस्ट बससाठी रांगेत उभं रहायचं, तासनतास वाट पाहायचं टेन्शन आता संपलं

Updated: Dec 21, 2021, 05:53 PM IST
BEST झालं! मुंबईची BEST होणार हायटेक, प्रवास होणार अधिक सुकर, कसा तो पाहा title=

मुंबई : मुंबईची बेस्ट बस आता हायटेक होणार आहे. बेस्टद्वारे बस, मेट्रोतून प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 'बेस्ट चलो अॅप' आणि 'बेस्ट चलो बस कार्डचं' लोकार्पण करण्यात आलं. मोबाईल अॅपवरुन बसचं तिकीट काढता येणार आहे. तसंच अपेक्षित बेस्ट बस ट्रॅकही करता येणार आहे. 

बेस्ट बससाठी लांबलचक रांगेत उभं राहवं लागतं, किंवा तासनतास बसची वाट पाहावी लागते. पण आता हा प्रवास सुकर करण्यासाठी खास अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. रांगेत उभं न राहताच प्रवासी बेस्ट बसचं ऑनलाईन तिकिट बुक करु शकणार आहेत. 

इतकंच नाही तर चलो अॅपद्वारे प्रवाशांना बसचं लोकेशनही समजणार आहे. त्यासोबतच बस येण्यासाठी किती वेळ लागणार आहे, बसमध्ये गर्दी आहे की नाही याची देखील माहिती तुम्हाला अॅपद्वारे मिळणार आहे. बेस्ट बसमध्ये कार्ड रिडर्सही असेल. त्यामुळे आता प्रवास करणं अधिक सोप होणार आहे.

बेस्ट चलो अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये

-बस थांब्यावर प्रतीक्षा करण्याची गरज संपली

- बस येण्याच्या लाईव्ह वेळेसहित बसचा लाईव्ह मागोवा 

- लाईव्ह प्रवासी संख्या दर्शक,  बसमध्ये किती गर्दी आहे हे कळणार, कमी गर्दी असलेली बस निवडता येणार

- मोबाईल तिकिटं आणि पास, सुट्या पैशाची कटकट नाही, पास केंद्रांवर जाण्याची गरज नाही

- ९ भाषांमध्ये उपलब्ध इंग्रजी, मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू

बेस्ट चलो बस कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये 

- कोणत्याही संपर्काविना कार्ड टॅप करून पैसे दया कारण तुमचे कार्ड कायम तुमच्याबरोबरच

- मोबाईल अॅप वापरून कोणत्याही बसमध्ये किंवा ऑनलाईन रिचार्ज करता येईल

- आपल्या पसंतीनुसार रिचार्ज करता येईल १० च्या पटीत ३००० रूपये पर्यंत कितीही रकमेचा रिचार्ज करता येईल

- कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाहय होणार नाही

- १ जानेवारी २०२२ पासून सर्व बसेस आणि शहरातील निवडक केंद्रांवर उपलब्ध

बेस्ट सुपर सेव्हर योजनांची वैशिष्ट्ये: .

-  वेगवेगळ्या ७२ पर्यायांमुळे प्रवासी त्यांच्यासाठी सर्वात अधिक योग्य असलेली योजना निवडू शकतात

- प्रति फेरीसाठी १.९९ इतके कमी मूल्य 

-  निवडलेल्या भाडे टप्प्यामध्ये बेस्ट नेटवर्कमधील वातानुकूलित असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही बसमधून कुठेही प्रवास करा

- मोबाईल अॅपवर तसंच बस कार्डवरही खरेदी करता येईल बेस्टच्या कोणत्याही बसमधील कंडक्टरकडून खरेदी करता येईल

बेस्ट चलो बस कार्डवरील प्रारंभिक ऑफर्स

- आपल्या पसंतीनुसार रिचार्ज- नवीन कार्डसाठी प्रारंभिक किंमत ₹७० + ₹१० च्या पटीत कितीही रकमेचा रिचार्ज करा.

- १० मोफत फेऱ्यांची ऑफर फक्त १०० रूपये मध्ये. प्रारंभिक किमत ₹७० मध्ये नवीन कार्ड + प्रत्येकी १० रूपयेपर्यंतच्या पुढील १० फेऱ्या मोफत मिळवा (वैधता २ दिवस).

- चलो बस कार्ड हे पैसे देण्याचे बस प्रवासाचे स्मार्ट कार्ड आहे ज्यावरुन तिकिटाचे पैसे रिचार्ज करता येतात आणि त्यावर बस पास किंवा सुपर सेव्हर योजना करण्याची सोय आहे.

- हा प्रकल्प 'चलो' या भारतातील आघाडीच्या वाहतुक तंत्रज्ञान कंपनीद्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे. 

- या उपक्रमाचा एक भाग म्हणून चलो'ने 'बेस्ट साठी बसमध्येच तिकिटे देणारी उपकरणे तसेच स्वयं तिकिटभाडे संकलन करणारा (एएफसीएस)  प्लॅटफॉर्मही सुरु केला आहे. 

- भारतामधील इतक्या मोठ्या प्रमाणातला हा पहिलाच डिजिटल बस प्रकल्प आहे

या सुधारणेमुळे मुंबईकरांना लंडन, सिंगापूर, आणि हॉंगकॉग यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांपेक्षाही अधिक चांगल्या दर्जाचा डिजिटल बस प्रवासाचा अनुभव येईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बेस्ट चलो अॅपवर मोबाईल तिकिटे आणि पास - प्रवासी, अॅपवर एका प्रवासाचे तिकिट/मासिक पास खरेदी करून फक्त त्यांचा फोन स्कैन करून प्रवास करू शकतात. विद्यार्थ्याचे पास आणि इतर सवलतीच्या दरामधील पासही उपलब्ध आहेत. यूपीआय, नेट बैंकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, वॉलेट्स, आणि इतर सर्व प्रकारच्या ऑनलाईन पद्धतींनी ऑनलाईन पैसे भरता येतात. 

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी): बेस्ट बस एनसीएमसीच्या माध्यमातूनही पैसे देण्याची सोय करतील, ज्यामुळे मुंबईकरांना एकच सामायिक कार्ड वापरून भारतात कुठेही बस, मेट्रो आणि एनसीएमसीचे अनुपालन करणाऱ्या इतर वाहनांमधून प्रवास करता येईल.

या डिजिटल सुविधांच्या सहाय्याने प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा करणे आणि बसमध्ये प्रवासी संख्या वाढवणे हा बेस्टचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे डिजिटल तिकिटांमुळे बेस्टचे रोख रक्कम हाताळण्याचे आणि पेपर रोलचे खर्चही कमी होतील.