Cidco Lottery : सिडकोच्या वतीनं नवी मुंबई (Navi Mumbai) आणि नजीकच्या भागांमध्ये घरं आणि व्यावसायिक गाळे अशा स्वरुपात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात भूखंड आणि घरं उपलब्ध करून दिले जातात. मागील कैक वर्षांमध्ये सिडकोच्या अनेकत गृहप्रकल्प योजनांमुळं सामान्यांना हक्काच्या घराचं स्वप्न साकार करता आलं आहे. 2024 च्या सुरुवातीलाही सिडकोनं तळोजा आणि द्रोणागिरी येथील 3322 गृहयोजना जाहीर केली होती. ज्यानंतर संपूर्ण प्रक्रियेनंतर या योजनेच्या सोडतीची अपेक्षित तारीख 19 एप्रिल असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, ही तारीख हुकली.
सिडकोच्या या सोडतीमध्ये असणाऱ्या 3322 घरांपैकी 61 घरं द्रोणागिरी नोड, 251 घरं तळोजा PM आवास योजनेअंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, द्रोणागिरीतील 374 आणि तळोजातील 2636 घरं सर्वसाधारण घटकांसाठी उबलब्ध करून दिली आहेत. अनेकांनीच या घरांसाठीच्या सोडतीसाठी अर्ज केला होता.
देशात लोकसभा निडणुकीच्या धर्तीवर लागू असणाऱ्या आचारसंहितेच्या कारणास्तव सोडत पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. असं असलं तरीही त्याबबातची माहिती प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून न देता संकेतस्थळावर थेट सूचना केल्यामुळं अर्जदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.
सिडकोकडून मिळणाऱ्या माहितीनुसार 8 मे रोजी ही प्रलंबित सोडत जाहीर केली जाईल असं संकेतस्थळावरच सांगण्यात आलं आहे. पण, आचारसंहिता संपत नसल्यामुळं ही सोडत आता नेमकी कधी जाहीर होणार हा प्रश्न पुन्हापुन्हा उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात देशात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपते. त्यात सोडतीसाठी हा मधला मुहूर्त कसा? असेही प्रश्न अर्जदारांना पडले. प्रत्यक्षात मात्र सिडकोनं आता संगणकीय सोडतीसाठी अर्थात Online Lottery साठी 8 मे ऐवजी 7 जूनची तारीख निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे.
सिडकोनं जवळपास मागील पाच वर्षांमध्ये साधारण तीस हजारहून अधिक घरं सोडत प्रक्रियेतून उपलब्ध करून दिली होती. पण, काही कारणांमुळं आजही सिडकोची हजारो घरं विक्रीविना पडून होती. ज्यापैकी तळोजा आणि द्रोणागिरी इथं असणाऱ्या घरांचा आकडा अधिक असून, त्यातील 3322 घरांची योजना सिडकोनं 2024 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर केली होती. याच योजनेच्या सोडतीसाठी आता अर्जदार प्रतीक्षेत असून, त्यांना सोडतीच्या नव्या तारखा दिल्या जात आहेत. तेव्हा आता 7 जून रोजी सिडकोची ही सोडत जाहीर होणार का आणि यामध्ये नेमकं कोण लाभार्थी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.