Lionel Messi in kerala : जगभरात फुटबॉल या खेळाची कमाल लोकप्रियता असून, अगदी ज्या देशांची नावंही सर्वज्ञात नाहीत अशा देशांमध्येसुद्धा या खेळातील काही खेळाडूंना कमाल लोकप्रियता मिळते. या खेळाडूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतातही असंच काहीसं चित्र असून, केरळ या दाक्षिणात्य राज्यामध्ये फुटबॉल हा खेळ कमालीचा लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यातही मेस्सी म्हणजे अनेकांच्याच आवडीचा खेळाडू.
फुटबॉलची पंढरी समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये नागरिकांच्या घरांपासून अगदी त्यांच्या मोबाईल वॉलपेपरपर्यंत सगळीकडेच या फुटबॉलचं प्रेम जणू ओसंडून वाहत असतं. अशाच या केरळात म्हणे आता चक्क मेस्सी राहायला आलाय.
विश्वास बसत नाहीये? सोशल मीडीयिावर सध्या मेस्सीचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे जिथं हा जगविख्यात खेळाडू सार्वजनिक वाहतूक साधनातून प्रवास करताना दिसत आहे. शेती करताना दिसत आहे, इतकंच काय तर, केळीचे घडही उचलताना दिसत आहे. केरळातील रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांपासून तिथं स्थानिकांसमवेत रम्यापर्यंत हा मेस्सी इथं रुळल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क होत असाल तर, एक गोष्ट लक्षात घ्या की हा एक AI तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेला व्हिडीओ आहे.
motions.cafe या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला सून, मेस्सीप्रतीचं प्रेम आणि निव्वळ मनोरंजानाच्याच हेतूनं तो तयार करण्यात आल्याचं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. फुटबॉल प्रेमींना काही क्षणांसाठी हा व्हिडीओ पाहताना खरंच मेस्सी केरळात आलाय की काय असा भासही झाला. थोडक्यात तंत्रज्ञान किती कमाल रितीनं काम करतंय हेसुद्धा हा व्हिडीओ पाहताना लक्षात येतं.
वरील व्हिडीओ एआयचा असला तरीही येत्या काळात मात्र मेस्सी केरळात येणार असल्याची माहिती खुद्द केरळ सरकारनंच काही दिवसांपूर्वी जारी केली. मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ पुढच्या वर्षी केरळात येणार असल्याचं सांगण्यात येत असून, या दौऱ्यासंदर्भातील सविस्तर माहिती मात्र अद्यापही जारी करण्यात आलेली नाही.