मुंबई : घाटकोपर पूर्वेला बेस्ट आगाराजवळ असलेल्या नाल्यावरील पूल महापालिकेने धोकादायक ठरवला आणि संध्याकाळी अचानकपणे वाहतुकीस बंद केला. यामुळे घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर जाण्यासाठी मुख्य मार्गच बंद झाल्याने नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतोय. हा पूल बंद केल्यानं पूर्व द्रुतगती मार्गावरून घाटकोपरला येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.
एलबीएस मार्गावरून घाटकोपर पूर्वेला जाणारी वाहतूक घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला स्टेशन परिसरातून जोडणाऱ्या पुलावरून तसंच चेंबूर सांताक्रूझ लिंक रोडवरून वळवण्यात आलीय. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. या नाल्यावरील पुलाचं बांधकाम कधी सुरू करणार, वाहतूक पूर्ववत कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह असल्याने नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.