मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती

 एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असताना आता ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आक्रमक होणार आहे. 

Updated: Aug 9, 2018, 07:46 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असताना आता ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आक्रमक होणार आहे. ओबीसी समाजाचा राज्य शासनाच्या सेवेतील बॅकलॉग भरून काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करत ओबीसी समाजाला खूष करण्याचा प्रयत्न केला. (संबंधित व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

ओबीसी समाजाची एकही जागा इतर समाजाला देणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय. आता याच्या पाठपुराव्यासाठी ओबीसी समाज आक्रमक होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती आहे.

मराठा आंदोलनाच्या दबावानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजारांच्या मेगा भरतीला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत 72 हजार पदांची भरती केली जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या स्थगितीमुळे मराठात्तेर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील ओबीसी समाजाचा बॅकलॉग भरण्याची घोषणा केली. 

सध्या राज्य सरकारमध्ये ओबीसींच्या ९२ हजार जागा भरल्या गेल्या आहेत, तर १ लाख १० हजार पदांचा बॅकलॉग आहे. हा बॅकलॉग भरला जाईलच, पण तो भरताना ओबीसी समाजाची एकही जागा इतर समाजाला दिली जाणार नाही अशी घोषणआ मुख्यमंत्र्यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर १५ दिवसात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन ओबीसी बॅकलॉग भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केलीय. तर दुसरीकडे ओबीसींचा बॅकलॉग भरल्याशिवाय राज्य शासनाने नवी भरती करू नये अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलीय.

एकीकडे मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मेगा भरतीला स्थगिती दिल्यानंतर नाराज झालेल्या ओबीसी समाजाला खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या नोकरीतील ओबीसींचा बॅकलॉग भरण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेमुळे आता ओबीसी समाज आक्रमक होणार असून दुसरीकडे मराठा समाजही या घोषणेमुळे नाराज होण्याची चिन्हं आहेत.