मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ अजूनही घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम आहे. मुख्यमंत्री आज राजीनामा देणार होते. मात्र त्यांची राजीनाम्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातही शांतता आहे. त्यामुळे भाजप नेमकं आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
भाजपाच्या गोटात काय खलबतं सुरु आहेत? मुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार होते पण ती अजून झालेली नाही. त्यामुळे भाजपकडे कोणता पर्याय असू शकतो, याची चर्चा आता राज्यात सुरु झाली आहे.
वर्षावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित आहेत. गरज भासल्यास युतीचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांनी झी २४ तासला दिली आहे. तसंच अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं काही ठरलेलं आपल्या माहितीत नसल्याचंही त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार बनेल असं गडकरी म्हणाले आहेत. बाळासाहेबांच्या काळातही ज्यांचे आमदार अधिक त्यांचा मुख्यमंत्री असं धोरण ठरलं होतं असं गडकरी म्हणाले. दरम्यान भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख आणि संभाजी निलंगेकर यांचा समावेश आहे. गडकरी एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले असून सर्वांनाच महायुतीचं सरकार हवं असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं आहे.