मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'हा' मास्टरप्लॅन

समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवणार

Updated: Aug 15, 2019, 02:50 PM IST
मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'हा' मास्टरप्लॅन title=

मुंबई: दुष्काळ पाचवीला पुजलेल्या मराठवाडा आणि विदर्भात पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. स्वातंत्र्यदिनी मुंबईत केलेल्या भाषणात त्यांनी याबद्दल माहिती दिली. त्यानुसार कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात वळवण्यात येणार आहे. तर वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भापर्यंत आणण्यात येईल.

देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गेल्या तीन-चार वर्षांमध्ये काही भागांमध्ये दुष्काळ आहे. यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. 

तसेच वैनगंगा- नळगंगा योजनेत ४८० किमीचा बोगदा तयार करून वैनगंगा नदीचे पाणी थेट पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.