ठाकरेंच्या मशालीला ढाल-तलवारीचं आव्हान, मुख्यमंत्री म्हणतात आता 'परफेक्ट काम झालंय'

शिंदे गटाला नवं चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Updated: Oct 11, 2022, 06:23 PM IST
ठाकरेंच्या मशालीला ढाल-तलवारीचं आव्हान, मुख्यमंत्री म्हणतात आता 'परफेक्ट काम झालंय' title=

मुंबई : आमची शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना, ढाल तलावर ही मराठमोळी निशाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निशाणी आम्हाला मिळाली आहे, आता परफेक्ट काम होणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यानी दिली आहे.  आमची बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb Shivsena) आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला (Shinde Group) बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तर ढाल-तलवार (Two Sword and Shield) हे चिन्ह दिलं आहे. नव्या चिन्हावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी आहे त्यामुळे आधीच घराघरात पोहोचली आहे असं म्हटलं आहे. 

निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी सकाळी 10 वाजता पाठवायची होती. त्यानुसार शिंदे गटाने ई-मेल करत तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केले. निवडणूक आयोगाने यापैकी ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.

आमच्या सभांना महाराष्ट्रांचं आराध्यदेवत शिवरायांना अभिवादन करून सुरूवात होते. त्यामुळे ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून आहे. ढाल तलवार विरूद्ध मशाल हा सामना नाही तर बाळासाहेबांची शिवसेना विरूद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेने ठरवायचं आहे की कोणासोबत राहायचं, असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले.