उद्धव-मोदींची 'मन की बात यशस्वी'? मिलिंद नार्वेकर राज्यपालांच्या भेटीला

यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा होती

Updated: Apr 30, 2020, 01:08 PM IST
उद्धव-मोदींची 'मन की बात यशस्वी'? मिलिंद नार्वेकर राज्यपालांच्या भेटीला title=
संग्रहित छायाचित्र

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला तांत्रिक पेच 'मन की बात'मुळे  सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर वर्णी लावण्यास असमर्थता दर्शविली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा होती. ही 'मन की बात' फळाला आल्याचे दिसत आहे.

काहीवेळापूर्वीच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचे समजते. कालपर्यंत महाविकासआघाडीचे नेते यासाठी राजभवनाच्या पायऱ्या झिजवत होते. मात्र, आज मिलिंद नार्वेकर यांनी एकट्याने जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव राज्यपालांकडून लवकरच मंजूर केल्या जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

तर दुसरीकडे हा तिढा न सुटल्यास महाविकासआघाडीने न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. २७ मे पूर्वी उद्धव ठाकरेंना आमदार व्हावं लागणार आहे आणि त्यांच्या हातात आता थोडे दिवस शिल्लक आहेत. हा पेच लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारकडून आता इतर पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. याच पर्यायांवर विचार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यपालांनी त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा प्रस्ताव मंजूर केल्यास ही वेळ येणार नाही.