मुंबई: मुंबई आणि पुण्यासह राज्यातील रेड झोन असलेल्या परिसरांमधील लॉकडाऊन इतक्यात उठवणे हितावह नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ३ मे नंतरही राज्यातील या भागांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ३ मे नंतर महाराष्ट्रातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात येतील, असे सांगितले. मात्र, याठिकाणी पुन्हा गर्दी होत असेल तर लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा लादण्यात येतील, असेही त्यांनी बजावले.
मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर आणि औरंगाबदचा परिसर हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे याठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरु झाले आणि कोरोनाचा विस्फोट झाला तर आतापर्यंत केलेली तपश्चर्या फुकट जाईल. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, जनता हीच खरी देशाची संपत्ती असते. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव संपल्यानंतर आपण राज्याचा गाडा या चिखलातून बाहेर काढू, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
तर दुसरीकडे राज्यातील आरोग्य यंत्रणा उत्तमप्रकारे कोरोनाचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ७५ ते ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची अतिसौम्य किंवा काही जणांमध्ये लक्षणेही नाहीत. केवळ त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार कोरोनावर जगभरात सुरु असलेल्या संशोधनावर लक्ष ठेवून आहे. प्लाझ्मा थेरपीसह शक्य तो प्रत्येक उपचार आपण करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:
* ३ मे नंतर राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध आणखी शिथील होतील.
* केंद्र सरकराने परवानगी दिल्यानंतर परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु. मात्र, नागरिकांनी गर्दी केल्यास हे सर्व तात्काळ थांबवले जाईल.
* मुंबई महानगरपालिकेकडून पल्सऑक्सिमीटरद्वारे नागरिकांची तपासणी. शरीरात ऑक्सिजन कमी असलेल्या आणि इतर विकार असलेल्या रुग्णांवर उपचार सुरु
* आतापर्यंत दोन हजार लोकांची तपासणी पूर्ण, २७२ लोकांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी किंवा इतर विकार आढळले.
* मुंबईत उपचारासाठी यंत्रणा कमी पडू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न. कोव्हिड योद्धाच्या माध्यमातून आणखी १० हजार आरोग्य कर्मचारी दिमतीला. मुंबईच्या बीकेसी मैदानावर हजारो बेडसची व्यवस्था.
* आजार अंगावर काढू नका. कोरोनाची लक्षणे आढल्यास तात्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जा. वेळेत कोरोनाची लक्षणे ओळखल्यास बरे होण्याची शाश्वती.
* खासगी डॉक्टर्स, क्लीनिक आणि रुग्णालयांनी पुढे येऊन मदत केल्यास कोरोनाच्या दहशतीमधून बाहेर पडायला मदत होईल.