मुख्यमंत्री बॅकफूटवर, पाथरीत साईंचे जन्मस्थान असल्याचे विधान मागे

 पाथरीमध्ये साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. 

Updated: Jan 20, 2020, 07:13 PM IST
मुख्यमंत्री बॅकफूटवर, पाथरीत साईंचे जन्मस्थान असल्याचे विधान मागे title=

मुंबई : पाथरीमध्ये साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावेळी पाथरीसाठी त्यांनी १०० कोटींचा निधी देखील जाहीर केला होता.  पाथरीला निधी देण्यास आमचा विरोध नाही पण पाथरी हे जन्मस्थान नाही. हे विधान मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावे अशी मागणी पाथरीकरांनी केली. त्यानंतर आज पाथरीत साईंचे जन्मस्थान असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले आहे. शिर्डी-पाथरी वादावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच एक बैठक पार पडली. 

या बैठकीत शिर्डी-पाथरी वादावर सकारात्मक चर्चा झाल्याचे भाजप नेते विखे पाटील यांनी सांगितले. साईंचे जन्मस्थान शिर्डीचं असल्यावर शिर्डीकर ठाम असल्याचे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे शिर्डी-पाथरी वादावर आता तोडगा निघाला का ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पाथरीला तीर्थक्षेत्र म्हणून निधी देण्यास विरोध नाही पण साईबाबांचे जन्मस्थान म्हणून निधी देण्यास शिर्डीकरांचा विरोध आहे. यामुळे शिर्डीचे महत्व कमी होईल अशी भीती त्यांना आहे. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी शिर्डी-पाथरीकरांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 

पाथरीला १०० कोटी देण्याचे आम्हाला मान्य आहे. जन्मस्थानाच्या वादावर चर्चा झाली नसल्याचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. १९३० साली दाभोळकृत साईचरित्र लिहीलं ते अधिकृत असून मान्य करावं अशी आमची मागणी होती आणि मुख्यमंत्र्यांना ते मान्य असल्याचे शिर्डीकरांनी सांगितले. 

साईबाबा हे सर्वांचे जन्मस्थान आहे. हा वाद दुर्देवी असून मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढायला हवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे सांगत पाथरीच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, शिर्डीकरांनी पाथरी साईबाबांचे जन्मस्थान असल्याच्या गोष्टीचा इन्कार केला होता. याविरोधात शिर्डीत बेमुदत बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद सध्या चांगलाच तापला आहे. 

या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी सोमवारी ट्विट केले. यामध्ये सत्यजित तांबे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. शिर्डीचा वाद म्हणजे सर्वसमावेशक देव आणि प्रतिके हिरावून घेण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शिर्डी विरुद्ध पाथरी हा वाद फक्त आर्थिक नाही. साईबाबा हे सर्वसमावेशक संत, देव मानले जातात. विसाव्या शतकात हा लोकांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेला सर्वधर्मी देव आहे. त्यांचं जन्मगाव, त्यांचा धर्म आणि त्यांची जात याबद्दल दावे केले जात आहे. बाबांनी त्यांच्या हयातीत ते कोण ,कुठले ही माहिती कुणालाही दिली नव्हती. मात्र, २१व्या शतकात त्यांची जात, धर्म याबद्दल दावे केले जात आहेत. हे सरळ साधे प्रकरण नाही. यामागे सर्वसमावेशक देव, प्रतीकं यांचे अपहरण करण्याचा हा डाव असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.