मुंबई : अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या दिवाळीची लगबग सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. नाही म्हटलं तरी बाजारपेठांमध्येही अनेकांनीच गर्दी केल्याचं दिसत आहे. पण, ही सर्व परिस्थिती आणि गर्दी सध्याच्या घडीला योग्य नाही. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपुष्टात आलेला नाही.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हीच बाब अधोरेखित करत राज्यातील जनतेनं भान ठेवून हा सरम साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी ऑनलाईन माध्यमांचाच वापर करावा असंही त्यांनी मोठ्या आग्रहानं सर्वांनाच उद्देशून सांगितलं आहे.
कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले, परिणामी कोरोनाला रोखून धरता येणं शक्य झालं असं सांगत त्यांनी इथल्या परिस्थितीची तुलना युरोपातील भीषण परिस्थितीशी केली.
दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान ठरेल हे ध्यानी घ्या असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सुरक्षित दिवाळी साजरा करण्याचं आवाहन केलं.
हा सण मोठा असला तरीही परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात कोरोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल. त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे उत्साह दाखवतांना त्यांचाही विचार मनात राहू द्या असंही त्यांनी न विसरता सांगितलं.
दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयं सुरु करायची आहेत....
दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयं सुरु करायची असून, पूर्ववत आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता या हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा, असा संदेश देत यंदाची दिवाळी ही पारंपरिक पद्धतीनं किल्ले बांधून, दिव्यांची आरास करुन साजरी करा असं आवाहन त्यानी केलं.