मुंबई : नारळाचं झाड एका महिलेच्या अंगावर कोसळून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये.... चेंबूरच्या स्वस्तिक पार्क इथं गुरूवारी सकाळी ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
कांचन नाथ ही महिला योगा क्लास आटोपून चंद्रोदय सोसायटीसमोरून जात असताना, सोसायटीतलं नारळाचं झाडं अचानक तिच्या अंगावर कोसळलं. काही काळ ही महिला त्या झाडाखाली दबली गेली. काही लोकांनी तिला बाहेर काढलं आणि खासगी रूग्णालयात भरती केलं. ती अजूनही बेशुद्ध आहे.
या सोसायटीतील रहिवाशांनी हे नारळाचं झाड तोडण्याची परवानगी पालिकेच्या एम पश्चिम विभागाकडं चार महिन्यांपूर्वी मागितली होती. सोसायटीनं हे झाड तोडण्यासाठी पैसेही भरले. पण पालिकेनं झाड सुस्थितीत आहे, असं कारण देत तोडलं नाही. आणि नेमकी आज ही दुर्घटना घडली.