कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक

कलर्सच्या पत्रावरुन मनसेचा शिवसेनेला टोला

Updated: Oct 29, 2020, 08:00 AM IST
कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक title=

मुंबई : जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा दिला होता. त्यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला माफीनामा पाठवला पण या दोन्ही माफीनाम्यात भाषेचा फरक होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा कलर्सने इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठी भाषेत लिहीला होता. यावरुन मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधलाय. 

'माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,' असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना दिलेल्या इंग्रजी माफीनाम्यावरुन खोपकरांनी शिवसेनेला कोपरखळी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत 'मनसे माफीनामा' असं ट्वीट त्यांनी केलंय. खरं सरकार कुठे आहे हे कलर्सवाल्यांना पण माहिती असल्याचा टोला खोपकरांनी ट्वीटरच्या माध्यमातून लगावलाय. 

मनसेच्या अमेय खोपकरांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. 'जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दात अमेय खोपकरांनी राग व्यक्त केला.

कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक

अमेय खोपकर यांनी ट्विट आणि व्हिडिओ द्वारे जान सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,' असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला.

मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे. एवढंच नव्हे तर प्रताप सरनाईक यांनी सलमान खानच्या पीआरओ टीमशी संपर्क साधून जान सानूला समज देण्यास सांगितले आहे. अन्यथा त्याला शिवसेनेचा आक्रोशाला सामोरं जावं लागेल असंही ते म्हणाले. 

महेश टिळेकर यांनी देखील एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जान कुमार सानूवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? प्रसिद्ध गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली त्यांना मोठं करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे. तिथं तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?” अशा शब्दात महेश यांनी जान कुमार सानूबाबत संताप व्यक्त केला.