मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांवरुन सत्तेत मित्र पक्ष असणा-या भाजप आणि शिवसेनेमध्येच श्रेयाची लढाई चव्हाट्यावर आलीय. मुंबईतील बोरीवली इथल्या अभिनव नगर सीटीआयआरसी केंद्र इथल्या उद्यानाचे उदघाटन आणि फायर ब्रिगेड स्टेशन लोकार्पणमुळे दोन्ही पक्षात जुंपलीय. या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम दोन्ही पक्षांकडून वेगवेगळा ठरवण्यात आलाय. त्यामुळे या भागातलं राजकारण तापलंय. सुरुवातीला या कार्यक्रमाचं उदघाटन शिवसेना संध्याकाळी पाच वाजता करणार होती. मात्र सेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपने याच उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता असेल असे होर्डिंग्स लावले.
भाजप आमदार प्रवीण दरेकर हे उदघाटन करतील असं या होर्डिग्सवर पाहायला मिळतंय. त्यामुळे भाजपच्या या कुरघोडीला शह देण्यासाठी आता शिवसेनेने आपल्या कार्यक्रमात बदल करुन हा उदघाटन कार्यक्रम सकाळी होणार असल्याचे होर्डिंग्स परिसरात लावलेत. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे या उद्यानाचे उदघाटन करतील. दुसरीकडे फायर ब्रिगेड स्टेशनचं उदघाटन भाजप संध्याकाळी करणार आहे. तर याच फायर ब्रिगेड स्टेशनचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते रविवारी होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन्ही पक्षात जोरदार क्रेडिट वॉर रंगलंय.