मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुं संदर्भातली उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. कुलगुरूपदाच्या निवडीसाठी नेमण्यात आलेल्या डॉ. कस्तुरी रंजन समितीने ३२ उमेदवारांच्या मुलाखती घेउन त्यातील ५ उमेदवारांची नावे राज्यपालांकडे सुपूर्द केली होती.
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी १९ एप्रिल रोजीच या पाचही उमेदवारांची अंतिम निवडीसाठी मुलाखत घेतली. राज्यपाल १९ एप्रिललाच कुलगुरू पदाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र २१ एप्रिल उजाडला तरी अद्याप कुलगुरू पदाचे नाव जाहीर झालेले नाही. यामुळे ही घोषणा का रखडली आहे याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. कुलगुरू पदाच्या निवडीत अनेकदा राजकीय हस्तक्षेप दिसुन येतो. यावेळीही या हस्तक्षेपामुळे निवड रखडल्याची चर्चा आहे.
कस्तुरीरंगन समितीकडे कुलगुरूपदासाठी 32 जणांनी अर्ज केले होते. या ३२ जणांच्या अर्जाची छाननी केल्यावर अवघे ५ अर्ज अंतिम फेरीत पोहोचले. आता या पाचपैकी कोणाची वर्णी कुलगुरूपदावर लागते याबाबत उत्सुकता आहे. डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरूपदावरून दूर केल्यानंतर सध्या प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. दयानंद शिंदे मुंबई विद्यापीठाचा कार्यभार सांभाळत आहेत.