मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कगंना रानौतने मुंबई, महाराष्ट्र, मुंबई पोलीस यांच्याबद्दल केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्यानंतर तिच्यावर विविध माध्यमातून टीका होत आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली होती. याचदरम्यान कंगनाने मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, राज्यपालांनी कंगानाला तातडीने भेट दिली याचा खेद वाटत असल्याचं म्हणत, राज्यपालांवर कसला दबाव होता का, असा सवालही केला आहे.
मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन अपमान करणाऱ्या कंगनाला राज्यपालांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटत असल्याचं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2020
म्हणूनच मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो.महामहीमांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. असो!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2020
ज्या त्वरेने अजोय मेहतांना बोलवले, तशीची कंगनाची कान उघाडणी केली असती तर महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता, असं म्हणत सचिन सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
जरी महामहीमांनी तीला भेट दिली तरी ज्या त्वरेने अजोय मेहतांना बोलावणे धाडले तशीच तीची कान उघाडणी केली असती तरी महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता. पण महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून तीने आमच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2020
अभिनेत्री कंगना रानौतने 13 सप्टेंबर रोजी रविवारी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, ही चर्चा झाली.
कंगनाच्या भेटीपूर्वी, राज्यपालांनीही कंगनाच्या कार्यालयावर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली होती, त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राजभवनवर बोलवून घेतलं होतं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगनाच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली. या प्रकरणात सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.
कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत मुंबई महापालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.