कंगनाने महाराष्ट्राच्या कन्येबाबत हीन शब्द वापरल्याचा जाहीर निषेध- सचिन सावंत

'महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांना भाजप संचालित कंगनाने अत्यंत हीन शब्द काढूनही भाजप गप्प का?'

Updated: Sep 18, 2020, 11:43 AM IST
कंगनाने महाराष्ट्राच्या कन्येबाबत हीन शब्द वापरल्याचा जाहीर निषेध- सचिन सावंत title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि महाराष्ट्र, मुंबई, मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहे. कंगना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन, नेपोटिझमवर सोशल मीडियाद्वारे भाष्य करत आहे. कंगनाने उर्मिला मातोंडकरवर निशाणा साधत सॉफ्ट पॉर्न स्टार असा उल्लेख केला होता. त्याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत वापरलेल्या हीन शब्दांचा जाहीर निषेध केला आहे. महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांना भाजप संचालित कंगनाने अत्यंत हीन शब्द काढूनही भाजप गप्प का असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे.

कंगनाने उर्मिला मातोंकर यांच्याबद्दल हीन शब्द वापरल्यानंतर महाराष्ट्र भाजपने साधा निषेधाचा एका शब्दही काढला नसल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय. मतदारयादीत तिचं नाव वांद्रे पश्चिम मतदारसंघात असतानाही शिवसेनेला मतदान केलं असल्याचं खोटं सांगते, असं असूनही आशिष शेलार गप्प का, असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे. 

कंगना मोदी सरकारप्रमाणेच खोटारडी असून, भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी तिची निवड केली असल्याचा, टोलाही सचिन सावंत यांनी लगावला आहे. कंगनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची तात्काळ माफी मागावी, असंही सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, कंगनाने उर्मिला अभिनयासाठी ओळखली जात नसून सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणून उल्लेख केला होता.