काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द

'सिल्व्हर ओक' बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी 'आजची बैठक रद्द झालीय... मी बारामतीला निघालोय' असं म्हटलं... 

Updated: Nov 13, 2019, 08:02 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द

मुंबई : सत्तास्थापनेच्या 'महाशिवआघाडी'च्या गोंधळात आता आणखीन वाढ झालीय. बुधवारी सायंकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक अचानक रद्द करण्यात आलीय. या समितीमध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे आहेत. तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आलीय.

यावेळी, 'सिल्व्हर ओक' बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी 'आजची बैठक रद्द झालीय... मी बारामतीला निघालोय' असं जरा रागातच म्हटलं. पण याचबद्दल अजित पवार यांच्यानंतर बाहेर पडलेल्या जयंत पाटील यांना विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी प्रथम 'बैठक होणार असल्याचं' म्हटलं. परंतु, पत्रकारांनी अजित पवारांनी पत्रकारांना वेगळीच माहिती दिल्याचं सांगितलं तेव्हा मात्र ते थोडे गांगरले... आणि तिथून निघून गेले.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची पहिली बैठक पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात आज सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेसोबत प्रत्यक्ष चर्चा करण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता असावी, यासाठी समन्वय समितीची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओक इथं जाऊन शरद पवारांशी चर्चाही केली होती.