सायली कोलगेकर, झी २४ तास, मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु असल्यानं बऱ्याच जणांचे हाल होताहेत. काहींना वेळेवर जेवण नाही, तर काही जण घरापासून दूर एकटे अडकले. असचं काहीसं लहानग्या श्रिज्ञा सोबत घडतय. आई परिचारिका आहे म्हणून ४ दिवसांसाठी आजीआजोबांकडे गेलेली १ वर्षाची श्रिज्ञा गेले २ महिने गावीच आहे. तिला भेटण्यासाठी तिची परिचारीका असलेली श्रिज्ञाची आई गावच्या वेशीपर्यंत पोहोचली पण कायद्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी तिला परत पाठवले आणि मायलेकींची भेट होता होता राहून गेली.
या ८ मार्चला श्रिज्ञाचा पहिला वाढदिवस झाला. तेव्हा भारतात कोरोनाची एन्ट्री झाली होती. मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडत होते. सगळीकडे कोरोनाची दहशत पसरत होती. कोरोनाच्या या भितीने, नातीच्या वाढदिवसासाठी गावावरून आलेले श्रिज्ञाचे आजी आजोबा तिला ४ दिवसांसाठी गावी घेवुन गेले. कारण तिची आई हॉस्पिटलमध्ये परिचारीका आहे. बाळ, वर्षाचं असो की ६ महिन्याच, नोकरीवर हजर व्हावच लागतं. नोकरीमुळे बाळाकडे दुर्लक्ष नको, म्हणून श्रिज्ञाला आजी आजोबांसोबत पाठवण्यात आलं आणि गेले 2 महिने दूध पिणारं पिल्लू अचानक आईपासून दूर गेलं.
४ दिवसासाठी गेलेली श्रिज्ञा गेले दोन महिने आई शिवाय राहतेय. सुरुवातीचे काही दिवस ती व्यवस्थित राहीली पण आता आईने व्हिडिओ कॉल जरी केला तरी श्रिज्ञा रडायला लागते. ते पाहून तिच्या आईचे डोळे पाणवतात. मुलीच्या ओढीने तिचा जीव कासावीस होतो.
परिचारीका असल्याने देश सेवेत रमलेली आई मातृत्वापासुन थोडीशी दूरावलीये. या सगळ्याला बाजूला सारून एक दिवस तिने स्वतःच मेडीकल आणि फिटनेस सर्टीफिकेट पतीसह गाव गाठण्याचा निर्णय घेतला. खूप दिवसांनी ती श्रीज्ञाला भेटणार होती. त्यामुळे दोघेही खूप आनंदात होते. पण इथेही त्यांच्या भेटीत फूट पडली.
रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये तिच गाव आहे. अगदी घरापासुन अर्ध्या तासावर ती पोहोचली देखील. पण तरीही लॉक डाऊनमुळे कशेडी घाटाजवळ कडक बंदोबस्त करण्यात आल्याने या दोघांना तिथे अडवण्यात आलं. अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर जाऊन तिला पोलिसांनी परत जाण्यास सांगितले. दोन तास विनवणी करूनसुद्धा त्यांना त्या वेशीच्या पलीकडे जाता आलं नाही. पोलिसांनी त्यांनी ड्यूटी प्रामाणिकपणे केली. शेवटी, या दोघांना परत मुंबईला परतीचा प्रवास करावा लागला. मायलेकीची पुन्हा ताटातूट झाली.
श्रिज्ञा आणि तिची आई दोघी देखील आजही तितक्याच प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत मुलीच्या आठवणींचे अश्रु डोळ्यात असले तरी मुलीची भेट नक्की होणार याचं प्रेमळ हसु तिच्या चेहऱ्यावर उमटतं.. देशासाठी काम करत असल्याचं समाधान मिळत असल्याने, ती रोज नव्या ऊर्जेने कामाला लागते.