कोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर

कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता.  

Updated: Apr 4, 2020, 03:39 PM IST
कोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर title=

मुंबई : कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता. आता यात वाढ  झाली असून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर गेला आहे. गेल्या २४ तासांत ४७ रुग्ण वाढले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. अर्धी मुंबई कोरोनाच्या विळख्यात आहे. तसेच कोरोनाचा धोका हा झोपडपट्टीतील लोकांना आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे.

५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत 

 मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. चैत्यभूमीजवळच्या सूर्यवंशी हॉलमागील दिनकर अपार्टमेंटमध्ये हा रुग्ण सापडल्यानंतर ही इमारत सील करण्यात आलीय. कोरोना बाधित ६० वर्षीय रुग्णाला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर त्याची पत्नी आणि मुलाची चाचणी करुन होम क्वारंटाईन केलं आहे.

पूर्व मुंबई उपनगरांमधल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये देखील आता कोरोनाने शिरकाव केला आहे. विक्रोळीच्या टागोर नगर परिसरामध्ये एका २८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा परिसर आता पालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. तसेच सूचना फलक लावून आजूबाजूचा परिसर देखील पूर्णतः सील केला आहे.

मुंबईतील भायखळा परिसरात कुठल्याही भागात फिरलात तरी, तुम्हाला लॉकडाऊन आहे की नाही, असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहाणार नाही. कारण, इथल्या प्रत्येक गल्लीबोळात नागरिक बिनधास्त फिरत असल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. विशेष म्हणजे, या भागातील स्थानिक रहिवासी पोलिसांचंही ऐकत नसल्याचं पाहायला मिळत आहे.  घाटकोपर पश्चिमेच्या भटवाडी मंडईतही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. भटवाडी मंडईत याआधीच  दोन पॉझिटीव्ह रुग्ण मिळाले, मात्र  लोकांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.