कोरोनाचे संकट : रक्ताचा तुटवडा, 'सिद्धिविनायक' न्यासाचा रक्त संकलन संकल्प

राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे.  

Updated: Mar 26, 2020, 10:20 PM IST
कोरोनाचे संकट : रक्ताचा तुटवडा, 'सिद्धिविनायक' न्यासाचा रक्त संकलन संकल्प
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकरांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी रक्तदान केले. आता सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने आता रक्त संकलन करण्याचा संकल्प केला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्यावतीने रक्तदानाबाबत करण्यात आलेल्या आवाहनानुसार रक्ताचा तुटवडा लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प  करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यमंत्र्यांच्या कुटुंबीयानी २० सदस्यांनी केले रक्तदान

मुंबईमध्ये राहाणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दुरध्वनीद्वारे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नोंदवावे, असे कळविण्यात आले आहे. 022-24224438, 022-24223206 रक्तदात्याच्या रहात्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल ,त्यामुळे रक्तदात्याना रहात्या ठिकाणी रक्तदान करता येईल. 

कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले आहे.