मोठी बातमी: COVID-19 चाचणीसाठी राज्यातील आठ खासगी लॅबना केंद्राची मान्यता

यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल. 

Updated: Mar 26, 2020, 08:33 PM IST
मोठी बातमी: COVID-19 चाचणीसाठी राज्यातील आठ खासगी लॅबना केंद्राची मान्यता

मुंबई: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७  खासगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आठ लॅबचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या लॅबमध्येच कोरोना टेस्ट केली जात होती. मात्र, कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ही सुविधा अपुरी पडताना दिसत होते. 

त्यामुळे आता थायरोकेयर केअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रो पोलीस हेल्थकेअर लिमिटेड,मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस आर एल लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड ठाणे या खासगी लॅबना कोरोनाची चाचणी करण्याच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.  

यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास या तपासणी केंद्रातून दररोज दोन हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे १२५ रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात राज्यात तीन नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.