'कोरोना लस'ची निर्मिती आता मुंबईतील 'ही' इन्स्टिट्युट करणार !

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन (Haffkine Biopharma Corporation) आणि हैद्राबाद येथील भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 'कोविड लस'चे (Corona Vaccine) उत्पादन करण्यात येणार आहे.  

Updated: Mar 18, 2021, 11:50 AM IST
'कोरोना लस'ची निर्मिती आता मुंबईतील 'ही' इन्स्टिट्युट करणार !  title=
संग्रहित छाया

मुंबई : हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन (Haffkine Biopharma Corporation) आणि हैद्राबाद येथील भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 'कोविड लस'चे (Corona Vaccine) उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.

कोविड लसीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने पुढे यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडे केले होते. यानुसार काल वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनचे संचालक संदीप राठोड, जनरल मॅनेजर सुभाष शंकरवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत अमित देशमुख बोलत होते.

भारत बायोटेकने लस तयार करण्याचे तंत्रज्ञान हाफकिन इन्स्टिट्युटला द्यावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे. महाराष्ट्रातच लस तयार होईल, त्यातले 25 टक्के उत्पादन महाराष्ट्राला मिळावे. तसेच दर आठवड्याला 20 लाख लसींचा पुरवठा करा, अशी मागणीही टोपे यांनी केली आहे. 

हाफकिनमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग आणि फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. 

कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत असून हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. 

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल.

भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनामार्फत नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्लांटसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली आहे.