मुंबई : देशभरात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. संपूर्ण देशात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसादही मिळाला. काल शुकशुकाट असलेल्या, ओस पडलेल्या रस्त्यांवर आज मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. काल जनतेने एक दिवस जनता कर्फ्यू पाळला पण आज सोमवारी त्याउलट अनेक जण रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. सरकारने देशातील रेल्वेसेवा, लोकलसेवा, बससेवा बंद केली आहे. मात्र असं असतानाही आज बेस्टने सुमारे २ हजार गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर उतरवल्या आहेत.
एवढी गरज नसताना नियोजनाअभावी अतिरिक्त बसेस रस्त्यावर उतरवल्या गेल्या आहेत. एकूण सव्वा तीन हजार बसपैकी २ हजार बस रस्त्यावर उतरल्या असल्याची माहित आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना, प्रवास करण्यास मुभा दिली असताना बेस्ट बसेसची रस्त्यावर गर्दी आहे. गरज नसतानाही बेस्टच्या २ हजार बसेस रस्त्यावर का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकल बंद असूनही रेल्वे स्टेशनवरून मिनी एसी बसेस चालवल्या जात आहेत. कंत्राटदारांच्या भल्यासाठी मिनी एसी बस चालवल्या जात असल्याची माहिती मिळत आहे. कंडक्टरचे न ऐकता सामान्य लोकही प्रवास करत असतानाचं चित्र आहे. तसंच मिनी एसी बसमध्ये कंडक्टर नसल्याने सामान्य लोक यातून प्रवास करताना दिसत आहेत.
रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूनंतर आज रस्त्यांवर खासगी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागण्याचं चित्र आहे. लोकल, बस बंद असून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलंय. लोकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतेयं. तरीही लोक आपापल्या खासगी वाहनांनी बाहेर पडले असून लोकडॉनच्या नियमांची पायमल्ली होताना दिसतेय.
दरम्यात, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 89वर पोहचली आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात 12 नवे रुग्ण, रविवारी 10 रुग्ण आणि आज सोमवारी पुन्हा मुंबई-पुण्यात एका दिवसांत नव्या 15 रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत एकूण 38 रुग्ण असून आतापर्यंत एकूण 2 जणांचा मृत्यू झाला आहे.