सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचेच सावट, अशी आहे नियमावली

 कोरोनाचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे.  

Updated: Jul 11, 2020, 09:13 AM IST
सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचेच सावट, अशी आहे नियमावली
संग्रहित छाया

मुंबई : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचेच सावट आहे. कोरोनाचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे. हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, गणेश मूर्तीची उंची कमी करण्याबरोबरच गणेश मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ १० कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहावे लागणार आहे. तसा नियम करण्यात आला आहे. मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळे असून त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव तडीस नेणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.

तसेच कोरोनाचे संकट असल्याने दिवसातून तीन वेळ गणेश मंडप  निर्जंतुकीकरण करावेत आणि मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.

गणेशोत्सव मंडळांसाठी नियम

- मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
- मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे.
- मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
-आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांना प्रवेश. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक.
-मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
-भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
-कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
- ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.