मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदी जाहीर केल्यानंतरही मुंबईकर वाहनचालक मोठ्या संख्येनं रस्त्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनचालकांची गर्दी दिसून आली. पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. वाहनचालकांना घराबाहेर पडण्याचं नेमकं कारण विचारलं जात आहे. पण एवढं काय महत्वाचं काम मुंबईकरांना आहे? की ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत हा प्रश्न उभा राहत आहे.
जमावबंदीच्या आदेशाला मुंबईकरांनी हरताळ फासल्याचे दृश्य दिसून येत आहेत. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या चेकनाक्यावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मुलुंड चेकनाक्यावर या गाड्या पोलिसांनी अडवल्या. मात्र, यावेळी काही मुंबईकरांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. राज्यात जमावबंदीचे आदेश आहेत. या आदेशाचा भंग केल्यास वाहनं जप्त करण्यात येतील असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे. तर नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
पश्चिम द्रुतगती मार्ग वाकोला जंक्शनजवळ वाहनांची तपासणी सुरू, समाधानकारक कारण नाही तर दंड वसुलीची कारवाई.....
वाहनांची गर्दी केवढी झाली आहे बघा.....
( फोटो @7.30 am ) pic.twitter.com/3PppozgvC0
— अमित जोशी (@amitjoshitrek) March 24, 2020
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदीचे आदेश दिले. जमावबंदीला पुरेसं यश न मिळाल्यानं आज राज्य सरकारनं आणखी कठोर पावलं उचलत राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. जिल्ह्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या असून खाजगी वाहनांना वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि वाहतूक मात्र सुरु राहील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
रस्त्यावर गाड्यांची गर्दी पाहता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद केली होती. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेल आहे. असं असताना शहरात गाड्या धावताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आज दुपारनंतर शहरातील वाहतूक थांबवण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबतचे आदेश एक क्षणी निघू शकतात.