मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३१ मार्चपर्यंत सगळीकडे 'लॉकडाऊन' करण्यात आलं आहे. अशावेळी राजकारण्यांपासून ते अगदी सामान्यांपर्यंत सगळ्यांनाच घरी राहण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले. अशावेळी राजकारणी मंडळी या संधीचा फायदा घेत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
शरद पवार मुलगी सुप्रिया सुळे आणि नात यांच्यासोबत बुद्धीबळाचा डाव खेळताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजकारणापलिकडचे पवार-सुळे कुटुंबिय दाखवत आहेत.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा भाग आहे. शरद पवार हे राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्व. शरद पवार आता राजकारणातून निवृत्ती घेतात की काय? अशी चर्चा रंगली असताना त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी दाखवून दिलेला उत्साह हा तरूणांना देखील लाजवणारा होता. शरद पवारांची पावसातील एक सभा ही संपूर्ण राजकारणाचं रूप बदलण्यात महत्वाची ठरली. बुद्धीबळ हा खेळ तसा सहज खेळता येणारा खेळ नाही. या खेळाला एक प्रकारची हुशारी आवश्यक असते. सुप्रिया सुळेंच्या या व्हिडिओत शरद पवार त्यांना सहज हरवताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. तसेच सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली होती. यावेळी शरद पवार देखील यामध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच भरभरून कौतुक करण्यात आलं. राजकारण सोडून ही मंडळी देशाच्या महामारी विरोधात उभे राहिले आहेत. तसेच २४ मार्च रोजी मोदींनी पुढील २१ दिवस 'लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे.