मुंबई : मुंबईत कोरोनाने चांगलंच थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ संपूर्ण मुंबईसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. राज्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या ७४८वर पोहचली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे आणखी ७० रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ५२८वर गेली आहे. सोमवारी २४ तासांत चार जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यापैकी मुंबईत आता 8 वॉर्ड सर्वाधिक डेंजर झोन, अतिगंभीर क्षेत्र असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जी साऊथ - लोअर परळ आणि वरळीचा परिसर
ई वॉर्ड - भायखळा , भायखळा फायर ब्रिगेड आणि आसपासचा भाग
डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर
के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग
पी नॉर्थ - मालाड, मालवणी , दिंडोशीचा भाग
एच ईस्ट- वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर कलानगर ते सांताक्रुझ (मातोश्री)
के ईस्ट - अंधेरी पूर्व चा भाग, चकाला, एमआयडीसी
एम वेस्ट - मानखुर्द परिसर
मुंबईत वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. वरलीत कोरोना रुग्णांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. तर भायखळ्याचा भाग असलेल्या ई विभागात ४८ रुग्ण, मलबार हिलच्या डी वॉर्डात ४० रुग्ण आणि अंधेरी पश्चिमच्या के पश्चिम विभागात ४० रुग्ण आढळून आले आहेत.
कुर्ल्यात कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळले आहेत. कुर्ल्याच्या एल विभागात एकूण १४ रुग्ण सापडले असून १४ पैकी ८ रुग्ण झोपडपट्टीमधील असल्याची माहिती मिळत आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. धारावीमध्ये कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. झोपटपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मुंबईसाठ मोठी धोक्याची घंटा ठरत आहे.