मुंबई : राज्यात कोविड-19 चा (covid-19) मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh) यांनी घेतला आहे. यानुसार 5 हजार 200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, तसे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात आज 47288 कोरोना बाधीत (Coronavirus) रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 26252 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2549075 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 451375 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.36 टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे दिवसागणिक रुग्णवाढत असल्याने अधिकचे वैद्यकीय मनुष्यबळ लागणार आहे. याबाबत देशमुख यांनी हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात देण्याची ग्वाही दिली आहे. (covid-19 : 5 thousand medical officers, 15 thousand nurses will be provided - Amit Deshmukh)
राज्यात आज 47288 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 26252 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2549075 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 451375 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.36% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 5, 2021
राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या-त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.
राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.