मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Kosari) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा मंजूर केला आहे. (Governor approves Anil Deshmukh's resignation) गृह विभागाचा कार्यभार कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांचेकडे देण्यास मंजुरी दिली आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्रामविकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले होते. तसेच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले होते. वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली होती. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.
१९९० ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर सात वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. दिलीप वळसे पाटील यापूर्वी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते, दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासू मानले जातात.
100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून झाला. यानंतर परमबीर सिंह हे न्यायालयात गेले आणि न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले, त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.