'कोविड'ने मृत्यू : सरकारची 50 हजारांची मदत मिळण्यासाठी इथं करा अर्ज

कोविड-19 (COVID-19) आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Updated: Dec 2, 2021, 11:53 AM IST
'कोविड'ने मृत्यू : सरकारची 50 हजारांची मदत मिळण्यासाठी इथं करा अर्ज title=
संग्रहित छाया

मुंबई : कोविड-19 (COVID-19) आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोविड-19ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी जारी केला आहे.

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले आहे. याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी  कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm  यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक

अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास...

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

अपिल करण्याची संधी

सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.