Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला

Saamana Editorial  : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता. 

Updated: Nov 3, 2022, 11:14 AM IST
 Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला title=

Saamana Editorial on Ravi Rana vs Bacchu Kadu : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादावर आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून  (Saamana Editorial) भाष्य करताना जोरदार टोला लगावण्यात आला आहे.  'सामना' अग्रलेखातून रवी राणा यांच्यासह भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे.  हनुमान भक्तीचा दाखला देत रवी राणा यांच्या विधानाची पाठराखण करण्यात आली आहे. 

रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून आता हल्लाबोल करण्यात आला आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारे आमदार असून ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा हा भक्त खोटं कसं बोलेल. राणा यांचा राम कोण आणि बोलविता धनी कोण? याचा शोध बच्चू कडू यांनी घेतला असता तर कडू सत्य समजलं असतं, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

50 आमदारांची प्रतिमा 'खोकेवाले'च!

राणांनी खोक्यांचं सत्य जाहीर केले, ते त्यांच्या रामाच्या मान्यतेशिवाय काय, असा सवाल विचारत राणांसह फडणवीसांवरही निशाणा साधण्यात आला आहे. राज्यात शिंदे गटाच्या त्या 50 आमदारांची प्रतिमा 'खोकेवाले'च असून कुठेही गेले तरी त्यांना 'खोकेवाले' असंच म्हणणार, अशी बोचरी टीकाही करण्यात आली आहे. उद्या शिंदे-फडणवीस सरकारने प्लास्टिक बंदीप्रमाणे राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही  'सामना' अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

रवी राणांनी पन्नास खोक्यांचं सत्य फडणवीस यांच्या मान्यतेनेच मांडल्याचा दावा या अग्रलेखातून करण्यात आला आहे. राणा हे हनुमानभक्त, फडणवीस समर्थक आहेत. त्यांचा बोलवता धनी कोण हे उघड आहे, असे म्हटलं आहे. त्यामुळे आता आमदार बच्चू कडू आणि रवी राणा आता शिवसेनेला प्रत्त्युतर देणार का, याचीही उत्सुकता आहे.

सरकारची जाहिरात, मनसेचा टोला

दरम्यान, सामना हे शिवसेनेचं मुखपत्र. सामनातून सातत्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जाते. पण याच सामनाच्या पहिल्या पानावर आज चक्क राज्य सरकारची पानभर जाहिरात छापण्यात आली आहे. यावरुनच आता मनसेनं ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. खोके सामनामध्ये पोहोचले का असा बोचरा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे. सामनातल्या या जाहिरातीवर नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. तसंच शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही नियुक्तीपत्र देतानाचा फोटो लावलेला आहे. आज 11 वाजता यशवंतराव चव्हाण येथे हा कार्यक्रम होणार आहे.  एकीकडे सरकारवर टीका करत असताना दुसरीकडे पानभर जाहिरात छापल्यानं विरोधकांनी निशाणा साधलाय.