मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, या भाषणापूर्वीच शिवसैनिकांच्या घोषणांनी शिवाजी पार्कवरील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी दाखल झालेल्या अनेक शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी केली.
दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून सध्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषणे सुरु आहेत. या सर्व नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली आहे.
आधी शिवसेनेला मोठा भाऊ संबोधलं जायचे. मात्र, आता भाजपासाठी शिवसेना छोटा भाऊ झालीय. सेनेचे बोट पकडून भाजपने मते मिळवली. मात्र, आता आगामी निवडणूकीत आम्ही दाखवून शिवसेना छोटा भाऊ आहे की मोठा भाऊ, हे दाखवून देऊ, असे रामदास कदम यांनी सांगितले.
तर खासदार संजय राऊत यांनीही पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा केला. एकूणच सर्व नेते उद्धव ठाकरे यांना स्वबळावर लढण्याचे आवाहन करताना दिसले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय घोषणा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.