मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालयं तसंच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून बंदच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाकडूनही आल्या आहेत, पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं आहे.
मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार अशा हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल प्रवास उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आला आहे. महिन्याला जेमतेम 15-20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, त्यातच महागड्या प्रवासाचा भार यांमुळे घर चालवायचं कसं? मुलांचे शिक्षण करायचे, की प्रवास खर्च भागवयाचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी होत आहे.