दिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या – जागतिक बँक

मुंबई आर्थिक राजधानी असली, तरी मुंबईपेक्षा दिल्लीतील कर्मचाऱ्यांना जास्त पगार दिला जातो, दिल्ली आणि मुंबईतल्या पगारात जवळजवळ ५० टक्के तफावत आहे.

Updated: Nov 2, 2017, 12:33 PM IST
 दिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या  – जागतिक बँक title=

मुंबई : मुंबईत दिल्लीच्या मानाने कमी पगार लोकांना मिळतो, तर सतत दगदग आणि धावपळीने त्रासलेल्या मुंबईकरांना सुट्टया मात्र जास्त असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.

मुंबई आर्थिक राजधानी असली, तरी मुंबईपेक्षा दिल्लीतील कर्मचाऱ्यांना जास्त पगार दिला जातो, दिल्ली आणि मुंबईतल्या पगारात जवळजवळ ५० टक्के तफावत आहे.

व्यवसाय सुलभतेबद्दलचा हा अहवाल जागतिक बँकेने सादर केला आहे. जगभरातील प्रमुख शहरांमध्ये मिळणारी सरासरी पगाराची आकडेवारी आता प्रसिद्ध झाली आहे. दिल्लीत सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला म्हणजेच कॅशिअरला दर महिन्याला १४ हजार पगार आहे, तर मुंबईत कॅशिअरला ८ हजार ६०० रूपये पगार आहे.

दुसरीकडे दिल्लीतील कर्मचाऱ्यांना पगार जास्त असला तरी सुट्ट्यांचं प्रमाण मात्र, मुंबईच्या तुलनेत कमी आहे, मुंबई सुट्टयांच्या बाबतीत आघाडीवर आहे. कदाचित मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना सुट्या अधिक गरजेच्या असाव्यात.

दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार जास्त असला, तरी तेथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी सरासरी १५ हक्काच्या रजा मिळतात. तर मुंबईतील कर्मचाऱ्यांना २१ हक्काच्या रजा मिळतात. 

मात्र तरीही मुंबईत मिळणाऱ्या भरपगारी रजांची संख्या ब्राझील आणि लंडनमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपगारी रजांपेक्षा कमीच आहे. ब्राझीलमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २६, तर लंडनमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २८ हक्काच्या रजा मिळतात. मुंबईतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार इतर विकसनशील देशांमधील शहरांमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा कमीच आहे.