TET परीक्षा गैरकारभार, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील

Updated: Dec 20, 2021, 03:49 PM IST
TET परीक्षा गैरकारभार, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी title=

मुंबई : TET परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे (Tukaram Supe) 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडलं. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला (GA Software Technologies) अभय याच तुकाराम सुपेंनी दिलं. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढलं.

आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता CBI चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. 

घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत?

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी मागणी फडवणीस यांनी केली आहे.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान, म्हाडा पेपरफुटी (Mhada Paper Leak) प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत 23 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जी.ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ अशी या आरोपींची नावे आहेत. प्रीतिश देशमुखच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये 23 हार्ड डिस्क, एक फ्लॉपी डिस्क, 41 सीडी तसंच इतर कागदपत्रं सापडली आहेत.