मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. या शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.देवेंद्र फडणवीस हे स्वत: मंत्रिमंडळाबाहेर राहणार आहेत. तर एकनाथ शिंदे आज संध्याकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
"विधानसभेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होती. भाजपा 105 जागा जिंकली, तर शिवसेना 56 जागांवर जिंकली. अशा 161 जागा आम्ही जिंकलो. अपक्ष मिळून 2019 साली युतीचे 170 आमदार निवडून आले. तेव्हा शिवसेना भाजपा युतीचं सराकर येईल असं वाटत होतं. जनतेनं भाजपा आणि शिवसेनेला कौल दिला होता. परंतु दुर्दैवाने शिवसेना नेतृत्वाने वेगळा निर्णय घेतला. ज्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. भाजपाला सत्तेबाहेर ठेवलं. जनतेनं मत महाविकास आघाडी सरकारला दिलं नव्हतं. ते भाजपा सेना युतीला मत दिलं होतं. महाविकास आघाडी सरकारनं जनमताचा अपमान केला आणि सरकार स्थापन केलं. गेल्या अडीच वर्षात कुठलीही नविन विकास योजना नाही. मविआच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांना भाजपा पूर्ण सहकार्य करेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
"महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाणं, ही खेदजनक गोष्ट होती. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित दुसरा मंत्री जेलमध्ये जातो आणि त्याला मंत्रिपदावरून देखील काढलं नाही. एकूणच रोज सावकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान..शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं. पण केव्हा झालं जेव्हा गव्हर्नरचं पत्र आलं तेव्हा..जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते तेव्हा. जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय घेतले. पण येणाऱ्या सरकारला हे निर्णय परत घ्यावे लागतील. कारण ते वैध मानले जाणार नाही, पण आमचं त्याला समर्थनच आहे.", असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
"एकनाथ शिंदे हे विधानसभेचे गटनेते आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत. भाजपाने हा निर्णय केला की, एकनाथ शिंदे यांना समर्थन देईल. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. मी स्वत: मंत्रिमंडळाबाहेर असेल पण हे सरकार व्यवस्थित याची जबाबदारी माझी देखील असेल. पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला भाजपा देणार. पुन्हा एकदा हिंदुत्वावादी विचारांचं सरकार सत्तेत येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिजन पुढे नेणारं सरकार सत्तेत येईल. ", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीकाही केली.