कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांना खडसावलं. आजोबा आणि नातवांमधल्या या वादावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आजोबा आणि नातवामधील हा वाद आहे, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. नातवाच्या बोलण्याला किंमत द्यायची की नाही, हे आजोबांनी ठरवायचं किंवा आजोबांना आवडेल, असं वागायचं की नाही, हे नातवाने ठरवायचं आहे,' असं फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान सुशांतसिंग राजपूत प्रकरणात शरद पवार यांनी सीबीआय चौकशी करायला हरकत नसल्याचं म्हटलं आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे, अशी प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. सुशांतसिंग राजपूत प्रकरणी पार्थ पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी केली होती. यावरुन शरद पवारांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. एवढं करुनही ज्यांना सीबीआय चौकशी हवी असेल, तर माझा त्याला विरोध नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.