"त्यांनी चांगल्या भावनेने..."; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नका असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय

Updated: Oct 16, 2022, 02:33 PM IST
"त्यांनी चांगल्या भावनेने..."; राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया title=

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात (andheri bypoll election) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहीत आपल्या पक्षाची भूमिका जाहीर केलीय. राज ठाकरेंनी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना जाहीर पाठिंबा देत भाजपने (BJP) उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ऋतुजा लटकेंविरुद्ध निवडणूक न लढवण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

"भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांसोबत, वरिष्ठांसोबत चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार दिला आहे. यापूर्वी जेव्हा आम्हाला विनंती केली तेव्हा आम्ही योग्य भूमिका घेतली. पण आताच्या परिस्थितीत मला निर्णय घेता येणार नाही. आमच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. त्यामुळे चर्चा झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देऊ शकेल. त्यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठवलं आहे. आम्ही त्या पत्राचा विचार करु पण निर्णय चर्चेअंती होईल," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय?

"प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र! एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं," अशी विनंती राज ठाकरे यांनी केलीय.

"मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल," असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.