दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय आहेत. त्यांनी केंद्राला सांगून महाराष्ट्राला कोरोनाच्या उपचारासाठी पुरवण्यात येणाऱ्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा सुरु ठेवावा, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन केले. ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून राज्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी करण्यात येणारा साहित्यसामुग्रीचा पुरवठा १ सप्टेंबरपासून बंद झाला आहे. त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु, दिल्लीचे ब्लू आय बॉय असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यासे हे पैसे वाचू शकतात. त्यांनी केंद्राला यासंदर्भात सांगावे. जेणेकरून राज्याचे ३०० कोटी रुपये वाचतील, असा दावा राजेश टोपे यांनी केला.
राज्य इगोसाठी नव्हे तर जनतेसाठी चालवायचे असते, फडणवीसांचा ठाकरेंना टोला
तसेच विरोधकांकडून आरोग्य सुविधांच्या वानवेबद्दल करण्यात येणारे आरोपही टोपे यांनी फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, मागची स्थिती तुम्ही ठेवली होती ती आम्ही स्वीकारली आणि काम सुरु केले. सध्याच्या घडीला पुणे हे देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या होणारे शहर आहे. देशपातळीवर तुलना करायची झाल्यास कोरोना चाचणीचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक कमी म्हणजे १२०० रुपये इतका आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्यभरात ४५० रुग्णालये होती. ही संख्या आता हजारापर्यंत जाऊन पोहोचल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी राज्यात कोरोनाचे १६,४२९ नवे रुग्ण आढळून आले. तर उपचार सुरु असलेल्या ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३,६४१ इतका झाला आहे. यापैकी २,३६,९३४ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील २७०२७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.