सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने दबाव टाकला का? फडणवीसांचा उद्धवना टोला

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Updated: Dec 10, 2019, 08:28 PM IST
सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने दबाव टाकला का? फडणवीसांचा उद्धवना टोला

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अजून स्पष्टता आणि सत्यता समोर आलेली नाही. त्यामुळे लोकसभेत शिवसेनेनं विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी राज्यसभेत कदाचित पाठिंबा देणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिला. तर लोकसभेत पाठिंबा दिल्यावर आता राज्यसभेवत संदिद्ध भूमिका का?, सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा दबाव आलाय का? असे सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय. 

या नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना राज्यसभेत कदाचित बाजूनेमतदान करणार नाही. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्यासारखे सर्वच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सूचवलेल्या सूचनांची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे, असेही ते म्हणाले होते.