'अजित पवारांच्या क्लीनचिटशी संबंध नाही'; फडणवीसांचं स्पष्टीकरण

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

Updated: Dec 8, 2019, 08:41 AM IST
'अजित पवारांच्या क्लीनचिटशी संबंध नाही'; फडणवीसांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना एसीबीच्या प्रतिज्ञापत्रात क्लीनचिट दिली गेली आहे. मात्र त्याच्याशी आपल्या सरकारचा संबंध नसल्याचं, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर २७ नोव्हेंबरला संध्याकाळी एसीबीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. संपूर्ण सत्तानाट्यानंतर त्यांनी पहिली मुलाखत झी २४ तासला दिली.

अजित पवार यांनी आपण शरद पवार यांच्याशी भाजपसोबत जाण्यासंदर्भात चर्चा केल्याचे आम्हाला सांगितले होते. शिवसेना आणि काँग्रेससोबत आम्ही सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करू. मी या गोष्टीची कल्पना शरद पवार यांना दिली आहे, असा दावा त्यावेळी अजित पवारांनी केल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सरकार स्थापनेचा निर्णय योग्य किंवा अयोग्य होता, हे मी वेळ आल्यावर सांगेन, असेही फडणवीस यांनी म्हटले.

सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांशी माझे बोलणे करून दिले होते, असा दावा फडणवीस यांनी मुलाखतीदरम्यान केला. मात्र, सरकार स्थापनेच्या रात्री नेमके काय घडले, हे मी योग्य वेळ आल्यावरच सांगेन. या सगळ्या प्रक्रियेत भाजपने कोणाशीही डील केली नाही. आम्हाला डील करायचीच असती तर आम्ही अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युलासाठी राजी झालो असतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.

नवीन सरकारकडून विकासकामांची अपेक्षा आहे. या सरकारला थोडा वेळ देऊ, पण त्यांनी काम केलं नाही तर त्यांना धारेवर धरू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ठाकरे सरकार आंतरविरोधानं भरलेलं असल्यामुळे फार काळ टिकणार नाही, असं भाकीतही त्यांनी केलं.

हे तीन पक्षांचे सरकार आहे. ते किती दिवस चालेल ते माहीत नाही. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि माझी मैत्री कायम आहे. या मैत्रीत दुरावा निर्माण झालेला नाही. तसेच उद्धवजी यांनी कोठेही तोडण्याची भाषा केलेली नाही. किंवा मीही काही भाष्य केलेले नाही. आमच्या दोघांच्यामध्ये कोणतीही भींत नाही. त्यामुळे ही मैत्री पुढे कायम राहिल, असे  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहेत, त्यामुळे ओबीसी नेत्यांवर अन्याय होण्याचा प्रश्नच नाही, असंही फडणवीस म्हणाले.