मुंबईत भरधाव कारने तरुणीला चिरडले, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

चुनाभट्टी भागात एका कारचा अपघात झाला. त्यात २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. 

Updated: Dec 7, 2019, 10:52 PM IST
मुंबईत भरधाव कारने तरुणीला चिरडले, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

मुंबई : चुनाभट्टी भागात एका कारचा अपघात झाला. त्यात २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. अर्चना पार्थे असे मृत तरुणीचे नाव आहे. काल रात्री हा अपघात झाला. स्वदेशी मिल वसाहतीत भरधाव कारने या तरुणीला धडक देऊन चिरडले. यात त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी धीरज शांताराम कदम आणि अक्षय तानाजी महानग्रे या दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, यातील मुख्य आरोपी असलेला चालक फरार आहे. चुनाभट्टी परिसरात चाळीबाहेर काही महिला आणि मुलं फिरत होत्या. त्यावेळी रस्त्यापलीकडून एक भरधाव वेगात आलेली कार पार्किंगमध्ये घुसली आणि उभ्या असलेल्या गाड्यांना धडक देत तरुणीला चिरडले.

मात्र मृत अर्चनाने दोन महिलांचा जीव वाचवला. अपघातानंतर स्थानिकांनी कारचालकासह दोन जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. कारमध्ये काही बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. कारमधील सर्वजण नशेत होते आणि त्यामुळे हा अपघात घडला आहे. यातील चालक हा फरार असून जोपर्यंत मुख्य आरोपीला पोलीस अटक करणार नाहीत तोपर्यंत अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.