धनंजय मुंडेंनी साडेपाच महिन्यात १८ किलो वजन घटवलं

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यानही मुंडेनी कमी केलं वजन

Updated: May 22, 2019, 06:35 PM IST
धनंजय मुंडेंनी साडेपाच महिन्यात १८ किलो वजन घटवलं

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राजकारणातील आपले वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागील काही महिन्यात आपले शारीरिक वजन प्रचंड कमी केलं आहे. लोकसभा निवडणुकीचा व्याप असताना आणि महाराष्ट्रभर दौरे सुरू असतानाही मुंडे यांनी आपले वजन कमी करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. त्यामुळेच मागील साडेपाच महिन्यात त्यांनी आपलं वजन १८ किलोंनी कमी केलं आहे. डिसेंबर २०१८ मध्ये धनंजय मुंडे यांचं वजन ९५ किलो होतं. हे वाढतं वजन प्रकृतीसाठी त्रासदायक असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी वजन कमी करायला सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये ९५ किलो असलेलं वजन १८ किलोंनी कमी करून ७७ किलोंवर आणलं आहे. नियमित व्यायम आणि योग्य डायट करून त्यांनी हे वजन कमी केलं आहे.

राजकीय जीवनात तणाव, धावपळ, दगदग, जेवणाच्या अनियमित वेळा, चहा पिण्याचे वाढलेलं प्रमाण याचा परिणाम शरीरावर होत असल्याचं धनंजय मुंडेंच्या लक्षात आलं. रोजच्या व्यस्त दिनक्रमामुळे व्यायामासाठी वेळ काढणंही अवघड होतं. अनेक राजकारण्यांच्या बाबतीत हीच बाब असल्याने मधुमेह, रक्तदाब, पित्त, पोटाचे विकार, सांधेदुखी असे अनेक व्याधी राजकारण्यांना जडत असल्याचंही समोर आलं आहे. यातूनच काम करण्याची क्षमता कमी होत असल्याचं धनंजय मुंडेंच्या लक्षात आलं. यातूनच वजन कमी करण्याचा पण त्यांनी केला. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतलं. यातून त्यांनी व्यायाम आणि डायटचा आपल्या दिनक्रमात समावेश केला.

वजन कमी करण्यासाठी दररोज १२०० कॅलरीज बर्न करायच्या असं टार्गेट मुंडेंनी ठेवलं. नेमक्या लोकसभा निवडणुकीच्या काळातच त्यांनी हे टार्गेट ठेवल्यानं व्यायामासाठी वेळ काढणं तसं अवघड होतं. मात्र कुठेही असलो तरी दररोज १ तास ८ किलोमीटर धावायचे हे त्यांनी ठरवलं होतं. सकाळी उठल्यानंतर धावण्यासाठी वेळ काढणं अवघड होतं. कारण सकाळपासूनच भेटायला घरी येणाऱ्यांची गर्दी कमी नसायची. भेटायला आलेल्या लोकांना टाळणंही तसं अवघडच होतं. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री एक तास धावण्यासाठी काढायचा असं त्यांनी ठरवलं. निवडणूक प्रचाराच्या काळात १० वाजता प्रचार संपल्यानंतर अनेकदा रात्री ११ वाजताही मुंडेंनी यात बदल केला नाही. 

प्रचाराची सभा संपली की गाडीने त्या गावातून बाहेर पडायचं आणि नंतर गाडीतून उतरून एक तास धावायचं असं अनेकदा त्यांनी केलं. धावण्याबरोबरच डायटकडे त्यांनी लक्ष दिलं. जेवणात कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्याचं त्यांनी बंद केलं. यात गव्हाच्या चपात्या आणि भात तर पूर्ण बंद केला. तर जेवण्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवले. यात पालेभाज्या, सोयाबिनची भाकरी, अंडी यांचा जेवणात समावेश केला. अंडी आणि सोयाबीन जेवणात दररोज खायला सुरुवात केली. सकाळच्या न्याहरीत अंड्यांचा समावेश केला.

https://lh3.googleusercontent.com/-dwPDZr9PVy8/XOVI1G72pmI/AAAAAAAAKF8/j_idwZ9XemcnZIEVjrbH2rUplWrPyU0ZgCK8BGAs/s0/2019-05-22.jpg

मागील साडेपाच महिने धनंजय मुंडे यांचा व्यायाम आणि डायटवरील नियंत्रण सुटलेलं नाही. आपलं वजन कमी करून मुंडे थांबलेले नाहीत. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील आणि राजकारणातील वरिष्ठ नेत्यांना आणि मित्रांनाही त्यांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. दिवसातील किमान एक तास धावण्यासाठी किंवा चालण्यासाठी काढा अशी आग्रहाची विनंतीच त्यांनी राजकारणातील आपल्या मित्रांना आणि ज्येष्ठ नेत्यांना केली आहे.