शहरांना हिरवंगार करणार 'मियावाकी' जंगल

मियावाकी पद्धतीने आता कमी जागेतही घनदाट जंगल बनू शकणार आहे. ग्रीन यात्रा संस्थेतर्फे जोगेश्वरी येथे असेच एक जंगल उभारले जात आहे.

Updated: May 30, 2019, 03:46 PM IST

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील नागरिक आणि झाडांचे गुणोत्तर हे झपाट्याने कमी होतंय. एका माणसामागे 7 झाडे असं प्रमाण असण्याची गरज असताना पाच झाडांमागे एक माणूस इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरीकरण झपाट्याने वेग घेतंय...टोलेजंग इमारती उभ्या राहतायत..मेट्रो, मोनोसारखे प्रकल्प शहरातून जात आहेत..पण यासर्वांच्या जागेवर असलेली झाडे गेली कुठे ? आधीच इथे जागेची अडचण..त्यात झाडं कुठे लावायची असा नाराजीचा सूर आपण आळवतो.. पण मियावाकी ही झाडे लावण्याची अशी पद्धत आहे जिथे कमी जागेत जंगल निर्माण होऊ शकते...उदाहारणार्थ जिथे 6 चारचाकी गाड्या उभ्या राहतात इतक्या लहान ठिकाणात 300 विविध प्रकारची झाडे लावली जाऊ शकतात. आपल्या शहरात अशी लहान जागेतील जंगल तयार करण्यासाठी 'ग्रीन यात्रा' ही पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेतलाय. मुंबईसह भारतातील महत्त्वाच्या शहरांनी आपले पन्नास टक्के हरित आवरण गमावले आहे. पण मियावाकी पद्धतीने आता कमी जागेतही घनदाट जंगल बनू शकणार आहे. ग्रीन यात्रा संस्थेतर्फे जोगेश्वरी येथे असेच एक जंगल उभारले जात आहे.

मुंबईतील राम मंदिर रेल्वेस्थानकाजवळील परिसरात एक जंगल आकार घेत आहे.. हे जंगल आहे मुंबईतलं पहिलं मियावाकी जंगल.. पर्यावण संवर्धनाचं काम करणाऱ्या ग्रीन यात्रा संस्थेनं या जंगलाची लागवड केलीये.. वाढतं शहरीकरणामुळे पर्यावणाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी कमी जागेत जास्त वनस्पतींची लागवड करुन हे जंगल उभारलं जात असल्याचे ग्रीन यात्राची  प्रशिक्षणार्थी रितंभरा सिंग सांगते.

काय आहे मियावाकी ?

मियावाकी ही जपानी संकल्पना असून मियावाकी यांनी जपानमध्ये हरितीकरणाचा एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग केला. जगभरात ३ हजार ठिकाणी तीन कोटीहून अधिक झाडे लावली. विशेष म्हणजे, लागवडीनंतर तीन वर्षांनी त्या ठिकाणी घनदाट जंगलच तयार झाले.मियावाकी अरण्ये ही पारंपारिक वृक्षारोपणाच्या तुलनेत दहापट जलद वाढतात तीसपट अधिक दाट असतात आणि शंभरपट जास्त जैवविविधता आणतात. दाट वृक्षारोपण जमिनीचे पाणी मोठ्या प्रमाणात राखून ठेवते आणि भू-जल पातळी तयार होते. पर्यायाने हे जंगल पक्षी आणि कीटकांना आकर्षित तर करतेच सोबत देशी फळे आणि वायु गुणवत्ता सुधारण्यास मदतही करते. त्यामुळे तुम्ही राहत असलेल्या इमारती किंवा कार्यालयाच्या परिसरातही हिरवे रान करु शकता असे आवाहन ग्रीन यात्राचे संस्थापक प्रदीप त्रिपाठी यांनी केले आहे.