कल्याण-डोंबिवली कन्टेन्मेंट झोन जाहीर, फक्त मेडिकल-हॉस्पिटल सुरू राहणार

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.  

Updated: Apr 27, 2020, 12:08 AM IST
कल्याण-डोंबिवली कन्टेन्मेंट झोन जाहीर, फक्त मेडिकल-हॉस्पिटल सुरू राहणार title=

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवे १२ रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आज नव्याने आढळलेल्या या १२ रुग्णांमध्ये ५ महिला आणि ७ पुरुषांचा समावेश आहे. यांतील दोन महिला या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आहेत. तर इतर दोन महिला आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय पुरूषांमध्ये २ आरोग्य कर्मचारी, एक करोनाबाधित रुग्णाचा जवळचा नातेवाईक, दोन पोलीस कर्मचारी आणि एक पत्रकार देखील आहे.  
 
या सर्व रुग्णांना सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.  कल्याण-डोंबिवलीतील एकूण १२९ रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत महापालिकेने लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर केले आहेत. संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसर महापालिका आयुक्तांनी कंन्टेन्मेट झोन जाहीर केला आहे. या भागामध्ये फक्त मेडिकल स्टोर आणि दवाखाने, रुग्णालयं सुरू राहणार आहेत. इतर कुठल्याही अस्थापनेला आपला व्यवसाय करता येणार नाही, तसंच विनाकारण घराबाहेर पडताही येणार नाही. कल्याण-डोंबिवलीकरांना फक्त अत्यावश्यक कामांसाठी घरा बाहेर पडता येणार आहे. आता येथील नागरिकांना भाजी आणण्यासाठी देखील घराबाहेर पडता येणार नसल्याचं पालिकेने सांगितले आहे. पालिकेने आता काउंटर सेलवर देखील बंदी आणली आहे, पण ग्राहकांना होम डिलिव्हरी मिळू शकेल.

यापूर्वी फक्त हॉटस्पॉटमध्ये हा नियम लागू होता, मात्र आता संपूर्ण महापालिका क्षेत्रात हा नियम लागू करण्यात आल्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांकडे घरा बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध  राहिलेला नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोणत्याही सामानाच्या खरेदीसाठी बाहेर न पडण्याचे आदेश महापालिकडून देण्यात आले आहेत.