धारावीत कोरोनाचे आणखी ६ रूग्ण वाढले, एकूण संख्या २८ वर

 धारावीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या २८ वर पोहोचली

Updated: Apr 10, 2020, 09:14 PM IST
धारावीत कोरोनाचे आणखी ६ रूग्ण वाढले, एकूण संख्या २८ वर title=

मुंबई : कोरोनाचं सावट आता आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत घोंघावू लागलं आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये आज आणखी ६ रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या २८ वर पोहोचली आहे.

धारावीतील मुकूंदनगर इथं ५ तर राजीव गांधी नगरमध्ये १ रूग्ण मिळाला आहे. त्यामुळे धारावीत मुकूंदनगर हे हॉटस्पॉट ठरु लागलंय. या विभागात आतापर्यंत ९ रूग्ण मिळाले आहेत.

मुंबईत १० जणांचा मृत्यू 

मुंबईतील वरळी, प्रभादेवी आणि धारावी या तीन ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कधीही न थांबणारी मुंबई आज ठप्प आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव येथे वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता ही वाढल्या आहेत. 

कोरोनामुळे आज मुंबईत १० जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची एकूण रूग्ण संख्या ९९३ वर पोहोचली आहे.

जगभरातील संख्या लाखावर 

जगभरातल्या कोरोना बळींचा आकडा आणखी काही तासात एक लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे. युरोप आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांत सुरु असलेला कोरोनाचा कहर इतका होता की एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या ९ दिवसांतच ५३ हजारांवर बळी गेले आहेत. या आकडेवारीनुसार रोज सरासरी ६ हजारांच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन या देशांत सध्या कोरोनाचं संकट तीव्र असून रोजच्या रोज या देशांत शेकडो बळी जात आहेत. जगभरात १६ लाखांवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून दररोज त्यात झपाट्यानं वाढ होत आहे.