Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: सुरतमधील भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर महिन्याभरातच या बाजारातून व्यापारी काढता पाय घेऊ लागले आहेत. हिरे उद्योगातील आघाडीचे नाव असलेल्या किरण जेम्स कंपनीने सुरतमधून गाशा गुंडाळून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून आपला कारभार सुरु करणार आहे. सुरत हिरे बाजारामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून किरण जेम्स कंपनीने काढता पाय घेतल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. बाजाराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागजीभाई सकारिया यांनी मागील आठवड्यात पदाचा राजीनामा दिला. नागजीभाईंनी अचानक राजीनामा दिल्याने हिरे उद्योगात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. या सर्व घडामोडींमुळेच या सुरतमध्ये नव्याने संसार थाटलेल्या बाजाराच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
किरण जेम्सने सुरतमधील हिरे बाजारातून बाहेर पडताना, सुरतमधील हिरे व्यापाराची चमक अत्यंत वेगाने ओरसत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत ही कंपनी दिवसाला 100 रुपये कमवते असं म्हटलं तर सुरतमध्ये हाच अकडा अवघा 20 रुपये इतका होता. तसेच सुरत शहर हे हवाई मार्गेने देशातील इतर भागांशी पुरेश्या प्रमाणात जोडलेलं नाही. सुरतमधून हिऱ्यांची वाहतूक कशी करायची हा प्रश्नही व्यापाऱ्यांसाठी गंभीर रुप धारण करत आहे, अशी माहिती बाजाराच्या मुख्य समितीच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच सुरतमधील मुख्य अडचण म्हणजे मुंबईत अनेक कुशल हिरे कामगार मुंबई सोडून सुरतमध्ये स्थलांतरित होण्यास तयार नाहीत.
सूरत डायमंड बोर्स नावाचं हे केंद्र रफ आणि पॉलिश्ड हिऱ्यांबरोबरच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असेल असं सांगण्यात आलं होतं. या केंद्रात अत्याधुनिक आयात आणि निर्यातीसाठी ‘कस्टम क्लीयरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित व्हॉल्टसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. अंदाजे 3500 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत 67 लाख स्क्वेअर फूट फ्लोअर स्पेसमध्ये पसरलेली आहे. जवळपास 4500 डायमंड ट्रेडिंग कार्यालयांसाठीची जागा आणि क्षमता या इमारतींमध्ये आहे. 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये, डायमंड रिसर्च अँड मर्कंटाइल (DREAM) सिटीचा भाग असलेल्या या इमारतीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून मान्यता दिली होती.
In Surat tomorrow, the Surat Diamond Bourse will be inaugurated. This will be a major boost to the diamonds industry. The ‘Customs Clearance House’, Jewellery Mall and facility of International Banking and Safe Vaults will be significant parts of the Bourse. pic.twitter.com/rJxwGxmCJb
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2023
सध्या सूरत आणि मुंबई या ठिकाणांहून हिरे बाजाराचा व्यापार होतो. पूर्वी मुंबई हे हिरे बाजाराचे एकमेव आणि देशातील मुख्य केंद्र होते. सूरत हिरे सराफा बाजार अर्थात Surat Diamond Bourse (SDB) मध्ये हिऱ्यांवरील कटिंग, पॉलिशिंग, व्यापार, संशोधन यासारख्या प्रक्रिया एकाच जागी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ज्यामुळे मुंबईतील हिरे उद्योग सूरतमध्ये स्थलांतरित होईल असे सांगितले गेले होते. मात्र त्याऐवजी अपुऱ्या सुविधा आणि अंतर्गत राजकारणाचा फटका या नव्या प्रयोगाला बसला असून हिरे व्यापाऱ्यांनी पुन्हा मुंबईचा रस्ता धरल्याचं चित्र दिसत आहे.