प्रशांत अंकुशराव, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : पबजी खेळण्यासाठी नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून मुंबईतल्या कुर्ला भागातील एका १८ वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली आहे. नदीम शेख असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव आहे. पबजी हा ऑनलाईन गेममध्ये जशी खेळाची पायरी वाढत जाते, तसा मोबाईल आधुनिक असावा लागतो. त्यामुळे नदीम शेखनं घरामध्ये ३७ हजार रुपयांची मागणी केली. पण घरच्यांनी नदीमला २० हजार रुपये दिले. यामुळे नदीमचं मानसिक संतुलन खराब झालं, आणि त्यानं शुक्रवारी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घरातल्या किचनमध्ये ओढणीच्या सहाय्यानं पंख्याला लटकून आत्महत्या केली.
नदीम हा त्याच्या भावाकडे महागडा मोबाईल मागत होता. आधी असलेल्या मोबाईलमध्ये नदीम पबजी खेळायचा, पण जुन्या मोबाईलमध्ये स्पेस कमी असल्यामुळे नदीमला महागडा मोबाईल हवा होता.
आत्महत्या करण्यापूर्वी नदीम पबजी खेळत होता. रात्री दोन वाजता नदीमच्या भावानं त्याला खेळ बंद करून झोपायला सांगितले. त्यानंतर मात्र नदीमचं पार्थिव सकाळी त्याच्या बहिणीला पंख्याला लटकलेले दिसले. नदीमच्या भावानं नेहरूनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोस्ट मॉर्टम करून नदीमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता नदीमनं आत्महत्या खरंच पबजी खेळण्यावरून केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.